शिवसेना उबाठा पक्षाचे तीव्र निषेध आंदोलन : उपनेते गुलाबराव वाघ, नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांनी व्यक्त केला तीव्र रोष
धरणगाव प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा कथित अवमान केल्याच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, त्याचे पडसाद धरणगावातही उमटले. शिंदे गटाच्या नेत्या शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने धरणगावात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ आणि धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत बाळासाहेबांच्या प्रतिमेचा अवमान शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत, अशी ठाम भूमिका मांडली. यावेळी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव केला.
बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मराठी माणूस, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसैनिकांसाठी ते श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या प्रतिमेचा अवमान करणे म्हणजे शिवसैनिकांच्या भावना दुखावणे असून, अशा प्रकाराचा तीव्र निषेध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान आणि जनमानसातील त्यांच्याविषयीची श्रद्धा लक्षात घेता, त्यांच्या छायाचित्राचा अवमान करणाऱ्या प्रकाराचा निषेध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.