एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात ‘उजेड पेरणारी माणसं’ संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट!
वैचारिक साहित्याच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना होणार मदत; खान्देशातील ८४ कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास पुस्तकात शब्दबद्ध
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या एम.ए. मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात जळगावचे लेखक आनंदा लोटन पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. एम.ए. मराठी भाग-१च्या द्वितीय सत्रातील ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी या पुस्तकाची निवड करण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना वैचारिक साहित्याच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध होणार आहे.
विभागप्रमुख तथा अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. म. सु. पगारे, समिती सदस्य डॉ. दीपक खरात, डॉ. भारती सोनवणे, प्रा. डॉ. युवराज मानकर, डॉ. सुनील अवचार आणि प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथांची निवड केली. त्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील पेन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या आनंदा लोटन पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.
एम.ए.च्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांना निवडक वैचारिक लेखनाचा अभ्यास करताना या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. खान्देशच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातील योगदान समजून घेण्यासाठीही ही साहित्यकृती महत्त्वाची ठरणार आहे.
खान्देशातील ८४ अवलियांचा जीवनप्रवास
‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकात खान्देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८४ व्यक्तिमत्त्वांचा संक्षिप्त जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण आणि ग्रामसंस्कृती अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या व्यक्तींच्या योगदानाची ओळख पुस्तकातून करून देण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवर कार्यरत राहून समाजजीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य लेखनातून जतन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून स्थान मिळाल्याने या पुस्तकाच्या साहित्यिक आणि वैचारिक उपयुक्ततेला शैक्षणिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे.
