चेतक इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणारा कंटेनर उलटला; नगावजवळ महामार्गावर अपघात!
कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती; चालक बचावला, दुचाकींचे मोठे नुकसान
धुळे (प्रतिनिधी) : चेतक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणारा कंटेनर मुंबई–आग्रा महामार्गावर नगाव गावाच्या पुढे उलटून अपघात झाला. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात कंटेनरमधील इलेक्ट्रिक दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक सुदैवाने बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून गुरुग्रामच्या दिशेने चेतक कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन कंटेनर जात होता. नगाव गावाजवळ महामार्गावर एका कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर रस्त्यावर उलटला. त्यामुळे कंटेनरमधील दुचाकींचे नुकसान झाले, तसेच कंटेनरलाही मोठा फटका बसला.
सकाळच्या वेळेत हा अपघात घडल्याने महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कंटेनर चालक या अपघातातून बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघातामुळे कंटेनर आणि त्यातील इलेक्ट्रिक दुचाकींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
