उंड्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; नागरिकांना अन्नदान वाटप
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच पार्श्वभूमीवर दलित पॅंथर महिला आघाडीच्या वतीने अन्नदान व अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उंड्री येथील वडाचीवाडी रोड, श्री राज अपार्टमेंट परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दलित पॅंथर पुणे शहर जिल्हा महिला अध्यक्ष सोनाली दूनघव यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत महान व्यक्तिमत्त्वाला आदरांजली अर्पण केली.
यानंतर गरजू नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमात करुणा खलुले, संगीता कदम, रंजना कोनापुरे, अर्चना चेंडके, सुरेखा माने, शुभांगी दिवटे, रश्मी गूऊन, धर्मात्मा कदम, कुंदन ठाकूर, गणपती चेंडके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या व नागरिक उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत समाजासाठी कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हा उपक्रम केवळ अभिवादनापुरता मर्यादित न राहता समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले. सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
