सुमारे ५० वधू-वरांचा सहभाग; राज्यभरातून पालकांची मोठी उपस्थिती
पुणे (शंकर जोग) : पुण्यात आयोजित राज्यस्तरीय ख्रिस्ती वधू-वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार पेठेतील पंचहौद येथील पवित्र नाम देवालयात पार पडलेल्या या मेळाव्यात सुमारे ५० वधू-वरांनी सहभाग घेत आपापले बायोडाटा सादर केले. विविध क्षेत्रांत कार्यरत, उच्चशिक्षित तसेच नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या युवक-युवतींच्या सहभागामुळे मेळाव्याला विशेष आकर्षण लाभले.
पवित्र नाम देवालय पंचहौद पुणे आणि ‘साप्ताहिक उपदेशक’ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून वधू-वर तसेच त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याला प्रतिसाद दिला. या माध्यमातून अनेक कुटुंबांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि योग्य जुळणीच्या संधी शोधण्याची संधी उपलब्ध झाली. मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी वधू-वरांची शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्ता. अनेक उमेदवार उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांत स्थिरावलेले आहेत. यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले. प्रत्यक्ष भेटीगाठी, संवाद आणि माहितीची देवाणघेवाण यामुळे विवाह जुळवणीसाठी उपयुक्त व्यासपीठ तयार झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रेव्ह. अशोक कॅरम, रेव्ह. जयंत गायकवाड, रेव्ह. जयप्रकाश आढाव, रेव्ह. प्रदीप वाघमारे, पास्टर अनिल गडकरी यांची उपस्थिती लाभली. तसेच सुनील शिरसाठ, सरोज पिल्ले, सुरेखा पुणेकर, भालचंद्र कांबळे, आशा गायकवाड, चंद्रकांत काळे, अर्पणा जाधव आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आली होती. सचिव मनोज येवलेकर, विजया इंदुरकर, विकास उमापती, आशा पाटोळे, राजेंद्र पवार, प्राजक्ता परोळ, प्रशांत सूर्यवंशी, रोजमेरी साठे, कौमुदी येवलेकर आणि शिरीष पाठक यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
या मेळाव्यामुळे विवाह जुळवणीच्या प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार असून अशा उपक्रमांमुळे समाजात सुसंवाद आणि एकात्मता वाढीस लागते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. भविष्यातही अशा प्रकारचे मेळावे अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला
