निगडी–पिंपरी मेट्रो कामाकडे दुर्लक्ष? नागरिक संतप्त; दखल न घेतल्यास रास्ता रोकोचा इशारा
३–४ महिन्यांपासून रस्ता बंद | खड्ड्यांमुळे आधीच अपघात | भाविक व नागरिक त्रस्त
पिंपरी-चिंचवड : निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पूल परिसरात गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला असून, उड्डाण पुलाखालील श्रीकृष्ण मंदिर समोरील रस्ता मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी रस्त्यावर खड्डे खोदून ठेवण्यात आले असून, ते अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, या खड्ड्यांमुळे यापूर्वी एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून तो जखमी झाला होता. तरीही संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप
या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. “खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी अनेकदा केली, मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
वाहतूक ठप्प; नागरिकांची गैरसोय
अंकुश चौक ते श्रीकृष्ण मंदिर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हा रस्ता सेक्टर २२ मधील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक निगडी प्राधिकरण भागात ये-जा करण्यासाठी वापरत होते. रस्ता बंद असल्याने त्यांना मोठा फेरा मारावा लागत असून, दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
भाविकांनाही अडचणी
श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि बंदोबस्तामुळे मंदिर परिसरात पोहोचणे अवघड झाले असून, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रास्ता रोकोचा इशारा
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरू न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. “प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर भक्ती शक्ती उड्डाण पुलाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे. एकूणच, मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे निर्माण झालेल्या या समस्येकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक असून, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
