पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे प्रदूषणाला आळा; पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासही मदत
वडगाव मावळ (जांभूळ) | प्रतिनिधी
नाम फाऊंडेशन सामाजिक संस्था आणि जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जांभूळ येथील खापरे ओढ्याची स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळाली असून ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी माजी सरपंच दशरथ आगळमे आणि माजी सरपंच गणेश बोराडे यांनी विशेष सहकार्य केले. साते येथील डोंगरदऱ्यांमधून उगम पावणारा खापरे ओढा पुढे इंद्रायणी नदीला जाऊन मिळतो. वर्षभर या ओढ्याच्या पाण्यावर परिसरातील जनावरांची तहान भागत असल्याने त्याचे स्थानिकांसाठी विशेष महत्त्व आहे.
गेल्या काही काळात ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी स्वच्छता मोहीम राबवत ओढ्याची साफसफाई केली आणि परिसर सुशोभित करण्यात आला.
पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या या कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार असून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच ओढ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरणाचा लाभ मिळणार आहे.
या कामासाठी उपसरपंच एकनाथ आप्पा गाडे यांनी स्वतः उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला व नियोजन केले. यावेळी रोहित काकरे, शामराव पोटवडे तसेच जांभूळ–सांगवी ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगेश जांभूळकर, बाळासाहेब ओव्हाळ आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत संबंधित संस्था व प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यातही ओढ्याची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रतिक्रिया
“खापरे ओढ्याच्या स्वच्छता उपक्रमाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले.”
— एकनाथ गाडे, माजी उपसरपंच
“पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज आहे. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास रोखण्यास मोठी मदत होईल.”
— रोहित काकरे, युवा उद्योजक
