> • छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधानावरून वातावरण पेटले
> • रितेश देशमुख, श्रीमंत कोकाटे, संजय राऊत यांनी आक्रमक, कडक शब्दात टीका
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून मनोरंजन सृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेते अशा दोन्ही स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अभिनेते रितेश देशमुख आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबरच इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला आहे.
रितेश देशमुख यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. भिवंडी येथील शक्तीपीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला पत्नी जेनेलियासह भेट दिल्यानंतर रितेश देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल कुणीही येतो आणि काहीही बोलून जातो, हे आता खपवून घेतले जाणार नाही.” महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
संजय राऊतांचा सवाल
खासदार संजय राऊत यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाचा समाचार घेताना सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अशा प्रकारचे विधान जर दुसऱ्या कुणी केले असते, तर आतापर्यंत काय झाले असते?” असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली. महाराजांच्या अपमानाबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नेमका वाद काय?
धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केवळ शास्त्रीच नव्हे, तर आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरही रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी हा अत्यंत हलकट पणा आणि नालायकपणा असल्याचे म्हटले. रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नसल्याचे तथ्य आता जगासमोर सिद्ध झालेले असतानाही जाणूनबुजून होणारे हे प्रयत्न निंदनीय आहेत, असे कोकाटे म्हणाले.
लोकभावना आणि मागणी
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्रातील विविध संघटना आणि सामान्य जनतेतून होत आहे. रितेश देशमुख यांनी “महाराजांबद्दल बोलताना प्रत्येकाने मर्यादा पाळलीच पाहिजे,” असे ठामपणे नमूद केले आहे. एकूणच, या वादग्रस्त विधानामुळे राजकारण आणि समाजकारण तापले असून, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
