२५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड; नेत्रतज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि सर्व सुविधा मोफत
नशिराबाद : नशिराबाद येथे आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ केंद्र आणि शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात एकूण १२० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
अल्प शुल्कात तपासणी, शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत
गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत न्यू इंग्लिश स्कूलसमोरील स्वामी समर्थ केंद्रात हे शिबिर पार पडले. केवळ २० रुपये नोंदणी शुल्कात रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली.
शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पनवेल येथे केली जाणार असून, त्यासाठी प्रवास, राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण सोय संस्थेमार्फत मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी
या शिबिरात डॉ. चंदन चौधरी आणि डॉ. गौरव तायडे या नामांकित नेत्रतज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने मोठी सोय झाली.
मान्यवरांची उपस्थिती
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुकंदा रोटे, गणेश चव्हाण, देविदास पाटील, डॉ. दीपक लोखंडे, डॉ. निखिल नारखेडे, सचिन छोडकर, दीपक कोळी, पुवन मराठे, जयेश पाटील आणि गणेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
टीमच्या परिश्रमामुळे यशस्वी आयोजन
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वेश देवी, प्रवीण सुनार, रोहन महाजन आणि नितीन तारकम यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, निवड झालेल्या २५ रुग्णांना लवकरच शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.
