१४० खोल्या तर ७० हून अधिक जोते जमीनदोस्त
कल्याण (संदीप शेंडगे) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली. आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई राबवण्यात आली असून यावेळी१५० तयार खोल्यांचे बांधकाम आणि ७० हून अधिक जोते जमीनदोस्त करण्यात आली.
या मोठ्या मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून बांधकाम व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई स्थानिक नगरसेवक राहुल मुकुंद कोट यांच्या तक्रारीची दखल घेऊन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार सातत्याने तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आल्याची तक्रार नगरसेवकांनी थेट आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घेत तातडीने बल्ल्यानी परिसरातील एनआरसी गोडाऊन च्या लगत असलेल्या दीडशेहून अधिक खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ही संपूर्ण कारवाई अतिशय गुप्तपणे नियोजित करण्यात आली होती. कुठे कारवाई होणार याची कल्पना ना पोलिसांना होती ना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांनाही शेवटच्या क्षणापर्यंत ताफा कुठे जाणार आहे कोठे कारवाई होणार आहे याची कल्पना नव्हती.

महापालिकेच्या या अचानक आणि कठोर कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. जमीनदोस्त करण्यात आलेल्या दीडशेहून अधिक खोल्या ह्या नवीनच तयार झाल्याचे दिसून येत होते त्यामुळे खोल्या तयार होताना प्रशासन काय करत होते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात खोल्या तयार होत असताना प्रशासनाला खबर का लागली नाही असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
काही कर्मचारी काही अधिकारी यामध्ये बांधकाम व्यवसायिकांशी साठे लोटे तर नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
