उज्ज्वल यशाची परंपरा कायम; श्वेता माळी विद्यालयात प्रथम
पारोळा प्रतिनिधी : संदीप पाटील
ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्या प्रसारक मंडळ, तामसवाडी संचलित माध्यमिक विद्यालय सार्वे बाभळे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी श्वेता दिनेश माळी हिने ८७.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैताली समाधान पाटील हिने ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर हर्षिता चंद्रकांत माळी हिने ८५.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यंदा शाळेचा एकूण निकाल तब्बल ९३ टक्के लागल्याने विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत शिक्षकांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केल्याने पालकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
“विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन केले आहे. भविष्यातही त्यांनी उच्च ध्येय गाठून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे,” अशा भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
