मुनीराबी शेख खलील विद्यालयात प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
।चेतन रोकडे । जामनेर।
जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ८७.९१ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या उज्ज्वल निकालामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयातील मुनीराबी शेख खलील हिने ८४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अश्विनी प्रवीण चौधरी हिने ८४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर माहेश्वरी संजय धनगर हिने ८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर बाजी मारली. याशिवाय गायत्री योगेश पवार, प्रणिता समाधान क्षिरसागर, महेंद्र समाधान बोरसे, गायत्री दीपक जवखेडे, रोहन अनिल चव्हाण, सोमेश दिनकर घोंगडे, नयन सुनील राऊत आणि आयान आशिक पिंजारी या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या लौकिकात भर घातली.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या बळावर हे यश संपादन केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवून दाखवले आहे. विद्यार्थ्यांनी यापुढेही उच्च शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे,” अशा शुभेच्छाही संस्थेच्या वतीने देण्यात आल्या. विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालामुळे पहूर परिसरात समाधानाचे वातावरण असून, गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
