सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
धरणगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी बोर्ड परीक्षेत सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाने पुन्हा एकदा १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या यशामुळे धरणगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी विद्यालयातून एकूण २८१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री अनिल पाटील हिने ९५.८० टक्के गुण मिळवत विद्यालयासह संपूर्ण धरणगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भूमिका कृष्णराव पवार आणि उज्वल सुभाष महाजन यांनी प्रत्येकी ९४.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला, तर खुशी चेतन भावसार हिने ९४.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यालयाच्या गुणवत्तेचा आलेख यंदाही उंचावलेला दिसून आला. तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले, तर १९६ विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, सचिव ललित उपासनी, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, व्ही. बी. पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
