नऊ वर्षांच्या चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार
जळगाव : धरणगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी आणि गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित शिक्षक नंदलाल नारायण मराठे (वय ५०, रा. द्वारकानगर, जळगाव) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे जून २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत पीडित बालिकेचा छळ करत होता. शाळेच्या वेळेत तो मुलीला वर्गात एकटे बोलवून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास “तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपीने चिमुरडीला दहशतीखाली ठेवले होते.
दरम्यान, एप्रिल महिन्यात शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर पीडित बालिका नातेवाइकांकडे गेली होती. सुरक्षित वातावरण मिळाल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार नातेवाइकांना सांगितला. मुलीची आपबिती ऐकून नातेवाइकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ बालिकेच्या आईशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
यानंतर पीडितेच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपी नंदलाल मराठे याला अटक केली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, “शिक्षकाच्या वेशातील अशा विकृत प्रवृत्तीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
