तपत्या उन्हात आंदोलन; प्रशासनासोबतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा, आंदोलन तात्पुरते स्थगित
धुळे (सूनिल निकम) : धुळे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मनपा प्रशासनाच्या कारवाईविरोधात अतिक्रमणधारकांसह आंबेडकरी समुदायाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. तपत्या उन्हात निघालेल्या या मोर्चादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून आंदोलनात सहभागी झालेल्या शिवाजी निंबा सोनवणे (वय ५०) यांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीसह दोन महिलांना भोवळ आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Dhule Municipal Corporation प्रशासनाने रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसांमुळे अतिक्रमणधारक आणि आंबेडकरी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधितांना पर्यायी जागेत पुनर्वसन करावे तसेच शहरातील सर्वच अतिक्रमणांवर समान कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
रेल्वे स्टेशन परिसरातून निघालेला मोर्चा बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात महिला, पुरुष, युवक तसेच लहान बालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, प्रचंड उष्म्यामुळे अनेक आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडू लागली. आंदोलन संपवून घरी परतल्यानंतर शिवाजी निंबा सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच दोन महिलांसह एका व्यक्तीस भोवळ आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलनकर्त्यांना शांत केले. त्यानंतर प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली.
सुमारे तीन ते साडेतीन तास चाललेल्या चर्चेनंतर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. पुनर्वसनासंदर्भात योग्य तो विचार केला जाईल तसेच संबंधित मागण्यांवर चर्चा सुरू ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मृत्यू झालेल्या शिवाजी सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “भीमसैनिक अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, या घटनेमुळे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसोबतच पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
