काळ्या फिती लावून मेडिकल व्यावसायिक रस्त्यावर; शासनाने निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
धुळे (सुनील निकम) : शासनाच्या ऑनलाइन औषध विक्री धोरणाविरोधात धुळे जिल्ह्यातील मेडिकल दुकानदार आक्रमक झाले असून आज एक दिवसीय बंद पाळत तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार मेडिकल दुकानदारांनी या संपात सहभागी होत आपली दुकाने बंद ठेवली. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्या देशव्यापी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाविरोधात संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान मेडिकल व्यावसायिकांनी शासनाच्या ऑनलाइन औषध विक्रीच्या निर्णयाचा निषेध करत “ऑनलाइन औषध विक्री बंद करा”, “स्थानिक मेडिकल व्यवसाय वाचवा”, “बनावट औषध विक्री रोखा” अशा घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मेडिकल व्यावसायिकांनी सांगितले की, शासनाने ऑनलाइन औषध विक्रीला प्रोत्साहन दिल्यास स्थानिक मेडिकल दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढणार असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. कंपन्यांकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली.
“आम्ही अनेक वेळा शासनातील मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनेही केली; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर देशव्यापी संपाचा मार्ग स्वीकारावा लागला,” असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून काही अत्यावश्यक मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यास संघटनेकडून परवानगी देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना औषधांचा तुटवडा भासू नये, यासाठी आवश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली. शासनाने ऑनलाइन औषध विक्रीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघाने दिला आहे.
