माजी आमदार अनिल गोटे यांची थेट पोलीस ठाण्यात तक्रार
टेलिकॉम कंपन्यांचे डिमांड ड्राफ्ट खासगी खात्यांत जमा झाल्याचा आरोप; ४५ कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी
धुळे (सुनील निकम) : धुळे महानगरपालिकेतील कथित ४५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी स्वतः धुळे शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहत पुराव्यांसह रितसर तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोन यांसह विविध टेलिकॉम कंपन्यांकडून धुळे महानगरपालिकेच्या नावाने देण्यात आलेले डिमांड ड्राफ्ट मनपाच्या अधिकृत खात्यात जमा न होता कथितरित्या खाजगी खात्यांमध्ये जमा करण्यात आले. या व्यवहारातून अंदाजे ४५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीत धुळे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त, तत्कालीन अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर आर्थिक अनियमितता आणि निधी गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये विविध आर्थिक व्यवहारांचे तपशील आणि संबंधित पुरावे जोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे महानगरपालिकेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.
या संदर्भात अँड. भूषण (बंटी) पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचे पुरावे संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आले असून, या गैरव्यवहाराची सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. आता या तक्रारीवर पोलीस प्रशासन आणि शासन स्तरावर काय भूमिका घेतली जाते, तसेच या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी कोणत्या यंत्रणेमार्फत केली जाणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
