अ प्रभागात 100 हून अधिक खोल्या आणि 70 जोते जमीनदोस्त; बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत 100 हून अधिक अनधिकृत खोल्या तसेच सुमारे 70 जोते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक मोहीम
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोरसे तसेच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोहिमेत पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक तसेच मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री सहभागी झाली होती.
वारंवार नोटिसांनंतर कारवाई
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. यापूर्वी संबंधितांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र बांधकामे हटविण्यात न आल्याने अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
जेसीबीच्या सहाय्याने बांधकामे पाडली
या कारवाईदरम्यान जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाई सुरू असताना परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
पालिका प्रशासनाचा इशारा
महापालिका प्रशासनाने नागरिकांना अनधिकृत बांधकामे टाळण्याचे आवाहन करत नियमबाह्य बांधकामांविरोधात पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
