‘पहिले विश्व अहिराणी संमेलन’ पोहोचले युनोपर्यंत; भाषेला प्रमाण दर्जासाठीच्या लढ्याला मोठे यश
जळगांव : खानदेशातील अहिराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा यासाठी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि अहिराणी साहित्यिकांकडून सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNO) युनेस्को (UNESCO) संस्थेने अहिराणी भाषेची अधिकृत दखल घेत गौरवपत्र पाठविल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.
जगातील विविध भाषा, बोलीभाषा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कार्य करणाऱ्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेच्या संवर्धनाच्या उपक्रमांची नोंद घेतल्याने खानदेशातील साहित्यिक, अभ्यासक आणि भाषाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अहिराणी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या चळवळीला या घटनेमुळे मोठे पाठबळ मिळाल्याचे मानले जात आहे.
केंद्र सरकारच्या भारतीय बोलीभाषा संवर्धन कार्यालयाचे मुख्यालय बंगलोर येथे असून, त्या कार्यालयातील अधिकारी श्रीमती काटजू यांनी ‘पहिले विश्व अहिराणी संमेलन’ याची विशेष दखल घेतली होती. शासकीय स्तरावर अहिराणी भाषा आणि तिच्या कार्यक्रमांची झालेली ही पहिली अधिकृत नोंद असल्याचे सांगितले जात आहे.
पहिल्या विश्व अहिराणी संमेलनातील विविध कार्यक्रमांच्या व्हिडिओ क्लिप्स आणि अहिराणी भाषेविषयीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ही माहिती युनेस्कोकडे पाठविण्यात आली. युनेस्कोकडून प्राप्त झालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघटनांचा उत्साह वाढला आहे.
अहिराणीला व्यापक ओळख मिळण्याचा मार्ग सुकर
अहिराणी ही खानदेशातील लोकजीवन, संस्कृती, परंपरा आणि साहित्याशी घट्ट जोडलेली भाषा असून, तिला स्वतंत्र प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. युनेस्कोच्या स्तरावर या भाषेची दखल घेतली गेल्याने भविष्यात अहिराणीला व्यापक ओळख मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
