‘सॉल्व्हथॉन २०२५-२६’च्या अंतिम फेरीला उत्साहात प्रारंभ
राज्यभरातील स्पर्धकांकडून नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण; समावेशक समाजनिर्मितीसाठी अभिनव कल्पनांना व्यासपीठ
मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘सॉल्व्हथॉन २०२५-२६ : इनोव्हेट फॉर दिव्यांगजन’ स्पर्धेच्या अंतिम निवड प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण सेंटर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढविले. यामध्ये यशवंत शितोळे, कविता मुरुगकर, केतन कोठारी, पारुल कुमठा यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी संशोधन, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणाऱ्या प्रकल्पांची गरज अधोरेखित केली.
दिव्यांगांच्या गरजांवर आधारित अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण
स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध जिल्ह्यांमधील आणि राज्यांमधील संघांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणारे प्रकल्प सादर केले. यामध्ये पुण्यातील मानव गटाचा ‘ब्लाइंड तिकीट सिस्टिम’, नाशिकच्या व्हिजनर्स गटाची ‘स्मार्ट ब्लाइंड स्टिक’, पालघरच्या प्रयास गटाचे दिव्यांगांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ, आंध्रप्रदेशच्या वी कॅन गटाचे स्वसंरक्षणासाठीचे डिव्हाइस, नाशिकच्या फार्मासिस्ट गटाचे औषध सेवन स्मरणयंत्र, पुण्यातील त्रिनेत्रा गटाचे नाडी तपासणी यंत्र तसेच नाशिकच्या जीओएम गटाचे ‘क्यूआरएक्स इन्फो’ हेल्थकेअर ॲप विशेष आकर्षण ठरले. या सर्व प्रकल्पांमध्ये दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वावलंबी, सुरक्षित आणि सक्षम बनविण्याची क्षमता असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. स्पर्धकांनी आपल्या कल्पना, संशोधन आणि तांत्रिक उपाय प्रभावी पद्धतीने सादर करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
समावेशक आणि सुलभ समाजनिर्मितीकडे महत्त्वाचे पाऊल
दिव्यांग व्यक्तींच्या गरजांचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या या संकल्पना भविष्यात समाजासाठी उपयुक्त ठरू शकतात. अशा स्पर्धांमुळे सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळते, तसेच अधिक समावेशक आणि सुलभ समाजनिर्मितीला चालना मिळते, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
आयोजनासाठी विशेष परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे संयोजक विजय कान्हेकर, विभाग प्रमुख दिपीका शेरखाने, समन्वयक मनिषा खिल्लारे यांच्यासह राहील शेख, हेजल न्यायनीत, समृद्धी पुजारी, शिवम जाधव आणि संकेत जांभळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
लवकरच होणार विजेत्यांचा गौरव
अंतिम निवड प्रक्रियेनंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तीन विजेत्या संघांची निवड करण्यात आली असून त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विजेत्या संघांचा सन्मान करण्यासाठी स्वतंत्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
