ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी
कल्याण : वालधुनी परिसरात महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभाची तोडफोड झाल्याचा आरोप करत बौद्ध समाज आणि भीम अनुयायांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बुद्धभूमी फाउंडेशनचे बौद्ध धम्मगुरू गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भीम अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान “बुद्धमूर्तीची तोडफोड सहन केली जाणार नाही” आणि “दोषींना तात्काळ अटक करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांच्या आरोपानुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत बुद्धमूर्ती, भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि परिसरातील शेकडो वृक्षांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे ही कारवाई पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे हा केवळ मालमत्तेच्या नुकसानीचा विषय नसून बौद्ध समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावणारा गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि जबाबदार व्यक्तींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यासंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने तसेच महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांना निवेदनही देण्यात आले.
काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच न्याय मिळाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गुन्हा दाखल न झाल्याने ठिय्या आंदोलन
पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, बुद्धमूर्ती आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या कथित तोडफोडीप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
