संजय गांधी निराधार योजनेतील नावे पुनर्स्थापित करून थकीत अनुदान देण्याची मागणी; अंत्योदय योजनेचा लाभ देण्याचाही आग्रह
धरणगाव : धरणगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेतील नावे वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ती तातडीने पुनर्स्थापित करून थकीत अर्थसहाय्य मंजूर करण्यात यावे, तसेच गरजू दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अपंग महासंघाच्या वतीने तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत तहसीलदारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवेदनात संजय गांधी निराधार योजनेतून वगळण्यात आलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची नावे पुन्हा समाविष्ट करून त्यांना थकीत अनुदान तातडीने मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दिव्यांगांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेत प्रशासन त्यांच्या हक्कांबाबत सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. “दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचा सन्मान, स्वावलंबन आणि शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
निवेदन देताना अपंग महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह रवींद्र काबरे, रमेश चौधरी, मुकद्दर देशपांडे, बाबूलाल पटेल, भरत पाटील, गजानन महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
