सहा तास पोलिस ठाण्यात प्रतीक्षा; नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन हलले, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
धुळे (सुनील निकम) : धुळे शहरातील मोगलाई परिसरात महिलांकडे पाहून वारंवार अश्लील हावभाव करून छेडछाड करणाऱ्या एका विकृत व्यक्तीविरोधात अखेर संतप्त महिलांनी एकजूट दाखवत कायदेशीर लढा उभारला. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी महिलांना तब्बल सहा तास ताटकळत राहावे लागले. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे धुळ्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोगलाई भागातील फुलेनगर परिसरात राहणारा संतोष दामोदर हा गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील महिलांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे महिला आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विकृत कृत्याला पुरावा मिळावा यासाठी परिसरातील एका महिलेने संबंधित व्यक्तीचे अश्लील हावभाव मोबाईलमध्ये चित्रीत केले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संबंधिताविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आणि थेट शहर पोलीस ठाणे गाठले.
मात्र, तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या महिलांची सुरुवातीला दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपस्थित महिलांनी केला. तक्रार दाखल करण्यात होत असलेल्या कथित टाळाटाळीमुळे संतप्त महिलांनी आणि नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी संबंधित व्हिडिओची पाहणी केल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षकांच्या स्पष्ट निर्देशानंतर अखेर सुमारे सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर संतोष दामोदर याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घडामोडीदरम्यान पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवक उपस्थित होते. स्थानिक महिलांनी सांगितले की, परिसरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने अनेक महिला मानसिक त्रास सहन करत होत्या. मात्र यापुढे अशा प्रकारांना मूकपणे सहन न करता एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या घटनेमुळे महिला सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणेची संवेदनशीलता, तक्रारींवर तातडीने होणारी कार्यवाही आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपीविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांकडून करण्यात येत आहे. महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
