सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील चार दशकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव
पुणे (शंकर जोग) : विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण कार्य आणि उत्कृष्ट नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणाऱ्या उदयोन्मुख अचिव्हर्स अवार्ड कौन्सिल या प्रतिष्ठित संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते कविराज संघेलिया यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
गेल्या चार दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कविराज संघेलिया यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.

कविराज संघेलिया यांनी पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर दोन वेळा सदस्य म्हणून काम केले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागात जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. समाजहितासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तसेच वाल्मिकी समाजभूषण पुरस्कार यांसारख्या विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
सध्या ते भारत वीर रत्नसिंह चावरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून सामाजिक बांधिलकी जपत विविध लोककल्याणकारी उपक्रम राबवत आहेत. मानद डॉक्टरेट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
