१८.५० लाखांचा गुटखा जप्त; आक्षेपार्ह दावे करणाऱ्या पतंजलीच्या २० उत्पादनांवरही कारवाई
धुळे (सुनील निकम) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात बेकायदेशीर अन्नपदार्थ व औषधांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला असून, त्याचाच प्रत्यय धुळे जिल्ह्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने एका दिवसात दोन महत्त्वाच्या कारवाया करत गुटख्याचा मोठा साठा जप्त केला, तर दुसरीकडे आक्षेपार्ह जाहिरातींद्वारे विविध आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजलीच्या २० हून अधिक उत्पादनांवर कारवाई करून ती जप्त व सील करण्यात आली.
पहिल्या कारवाईत मध्य प्रदेशातून पनवेलकडे जाणाऱ्या एका वाहनाची सोनगीर गावाजवळ तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सोनगीर पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक सुरेशकुमार बिरबल राम गुवरिया (रा. राजस्थान) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत धुळे शहरातील पतंजली शॉपिंग मॉलवर धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान विविध आजारांवर उपचार किंवा आजार पूर्णपणे बरे करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित उत्पादनांचा साठा जप्त करून सील करण्यात आला.
कारवाई करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये नारी कांती सिरप, मधुग्रिट टॅब, रेनोग्रीट टॅब, सीसटो ग्रीट टॅब, मेलानो ग्रीट टॅब, मेदोहर वटी टॅब, मेदा वटी टॅब, अर्जुना कांती यांसह मधुमेह, किडनी स्टोन, कर्करोग, कुष्ठरोग आदी आजारांवर परिणामकारक असल्याचा दावा करणाऱ्या विविध उत्पादनांचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सुमारे २७ हजार रुपये किमतीची २० हून अधिक उत्पादने जप्त करून सील केली असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर सुरू झालेल्या या धडक कारवाईमुळे गुटखा माफिया तसेच नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
