कृषी इनोव्हेशनमध्ये मुंबईच्या उदयचल हायस्कूलला प्रथम, तर कृषी बिझनेस प्लॅनमध्ये बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनचा अव्वल क्रमांक
जळगाव : “शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू हाच माझा खरा पुरस्कार आहे,” असे माझे वडील श्रद्धेय मोठेभाऊ नेहमी सांगत असत. त्यांचा विचारांचा वारसा पुढे नेत आज फाली (FALI) उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि समाधान पाहून भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक याच विद्यार्थ्यांमधून घडतील, असा ठाम विश्वास वाटतो, असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. फालीच्या दुसऱ्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृषी बिझनेस प्लॅन आणि कृषी इनोव्हेशन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे देशातील केळी उत्पादनात झालेल्या क्रांतीवरही प्रकाश टाकला.
ते म्हणाले की, ठिबक सिंचन, टिश्यू कल्चर आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे जळगावसह देशभरातील केळी लागवडीत मोठी वाढ झाली आहे. जळगावातून सुरू झालेली ही वाटचाल आज महाराष्ट्र, कर्नाटक ते मणिपूरपर्यंत पोहोचली असून टिश्यू कल्चरद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘ग्रँड नाईन’ जातीच्या केळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. मागील वर्षी भारतातून सुमारे ४,४०० कोटी रुपयांच्या केळीची निर्यात झाली असून देशाच्या फळ निर्यातीमध्ये केळीने प्रथम क्रमांक मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक बाजारपेठेत भारताचा सुमारे पाच टक्के वाटा असून २०४७ पर्यंत देशाची केळी निर्यात पाचपट वाढण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हवामान बदल, वादळे आणि गारपिटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केळी उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच आगामी काळात केळीच्या दोन नव्या जाती बाजारात आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
फालीच्या कृषी इनोव्हेशन आणि कृषी बिझनेस प्लॅन स्पर्धेत देशभरातील ५३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कृषी इनोव्हेशन सादरीकरणात मुंबईच्या विक्रोळी येथील उदयचल हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनने द्वितीय स्थान मिळविले. भंडारा जिल्ह्यातील मार्तंडराव पाटील कपगटे हायस्कूल तृतीय, रावजी फटे विद्यालय चौथे आणि नागपूरच्या मोहपा येथील न्यू इंग्लिश स्कूल पाचव्या क्रमांकावर राहिले.
कृषी बिझनेस प्लॅन स्पर्धेत बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनने प्रथम क्रमांक मिळविला. चोपडा तालुक्यातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय द्वितीय, एस.एस. पाटील विद्यामंदिर तृतीय, पुणे जिल्ह्यातील कुलस्वामी खंडेराय विद्यालय चौथे आणि मुंबईच्या उदयचल हायस्कूलने पाचवा क्रमांक पटकावला.
यावेळी फालीचे विद्यार्थी कार्तिक कुमार (मुंबई), तनिष्का बडगुजर (बडवानी, मध्य प्रदेश), शर्वरी चव्हाण (बारामती) आणि सुज्ञा हडवळे (जुन्नर) यांनी आपल्या अनुभवांना उजाळा दिला. माजी विद्यार्थी कृतिका लकडे आणि अजिंक्य डोंगरे यांनीही या उपक्रमामुळे झालेल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात गोदरेज अॅग्रोवेट, आयटीसी, स्टार अॅग्री, प्रॉम्पट, अमूल आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बेरी यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी शर्बोनी पोदार यांनी आगामी काळात फालीचा विस्तार देशातील सर्व राज्यांमध्ये करण्याचा संकल्प व्यक्त केला.
दरम्यान, फाली संमेलनाचा तिसरा आणि समारोपाचा टप्पा ७ व ८ जून रोजी पार पडणार असून विद्यार्थी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन व विकास केंद्राला भेट देणार आहेत. तसेच बिझनेस प्लॅन आणि इनोव्हेशन स्पर्धेतील अंतिम सादरीकरणानंतर विजेत्यांचा गौरव करून १२ व्या फाली संमेलनाचा समारोप केला जाणार आहे.
