आयुक्तांच्या आदेशानंतर अतिक्रमणाची मोजणी सुरू; तक्रारदाराच्या घराचीही मोजणी झाल्याने नवा वाद
धुळे | सुनील निकम । प्रतिनिधी
देवपूर परिसरातील रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या कथित अतिक्रमणाविरोधात गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नितीन शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने संबंधित प्रकरणाची दखल घेत अतिक्रमणाची मोजणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मोजणीची प्रक्रिया सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवपूरातील वीर सावरकर रस्त्यावर राहणारे नितीन शिंदे यांनी परिसरातील रस्ता अतिक्रमणामुळे बाधित झाल्याची तक्रार अनेक महिन्यांपूर्वी महापालिकेकडे केली होती. संबंधित अतिक्रमण हटविण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
आत्मदहनाचा प्रयत्न रोखल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमणाची संयुक्त मोजणी सुरू केली. मात्र, केवळ तक्रारीतील जागेपुरतीच नव्हे तर तक्रारदार नितीन शिंदे यांच्या घराचीही मोजणी करण्यात आल्याने परिसरात नव्या चर्चांना उधाण आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेच्या पथकाने दोन्ही बाजूंच्या जागांची पाहणी करून मोजणी पूर्ण केली असून, आवश्यक असल्यास तक्रारदाराच्या मालमत्तेतील कथित अतिक्रमणाबाबतही कारवाई होऊ शकते, असे संकेत संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे प्रशासन हलले का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता मोजणी अहवालाच्या आधारे महापालिका कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
