पोलीस स्टेशनजवळ रात्री घडली घटना; हाताच्या तळव्याला गंभीर दुखापत, नागरिकांकडून लोंबकळणाऱ्या वायरी हटविण्याची मागणी
नशिराबाद | प्रतिनिधी
नशिराबाद येथील पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री अचानक सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे इंटरनेटची केबल तुटून चालत्या दुचाकीवर पडल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली. किरण माळी (रा. नशिराबाद) असे जखमी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण माळी हे रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपले काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. ते नशिराबाद पोलीस स्टेशनजवळ पोहोचताच अचानक जोरदार वारा सुटला. वाऱ्याच्या वेगामुळे रस्त्यावरील इंटरनेटची केबल तुटून थेट त्यांच्या चालत्या दुचाकीवर आली. या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या हाताच्या तळव्याला गंभीर दुखापत झाली असून तळवा कापल्याने रक्तस्रावही झाला. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रसंगावधान राखल्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.
मित्रांची तत्परता ठरली जीवदान देणारी
अपघात होताच परिसरात उपस्थित असलेले धीरज सैतवाल आणि चेतन सपकाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी किरण माळी यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
धोकादायक लोंबकळणाऱ्या केबल्सचा प्रश्न पुन्हा चर्चेत
वादळी वाऱ्यामुळे हा अपघात घडला असला तरी शहरातील अनेक भागांत इंटरनेट व केबलच्या वायरी निष्काळजीपणे सैल आणि लोंबकळत्या अवस्थेत टाकण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वाऱ्यातही अशा वायरी तुटून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक वायरींची दुरुस्ती करावी आणि सुरक्षित व्यवस्था सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
