यंत्र इंडिया लिमिटेड आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथे शिबिर; 715 दिव्यांगांना सुमारे 95 लाखांच्या साहित्याचे वाटप होणार
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत दिव्यांग नागरिकांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मोफत सहाय्यक उपकरणे व सहाय्यक साधनांच्या वितरण शिबिराचे आयोजन केले. यंत्र इंडिया लिमिटेडचा एक घटक असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात 105 दिव्यांग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले.
15 जून 2026 रोजी शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजित या शिबिराला लाभार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाअंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळने एकूण 715 दिव्यांग लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणे व साधनांचे वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे 95 लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
15 जून ते 23 जून 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांद्वारे या साहित्याचे टप्प्याटप्प्याने वितरण केले जाणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑर्डनन्स फॅक्टरीचे कार्यकारी संचालक निरंजन लाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला धुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा, ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक डॉ. आर. एन. झा, कमलेश यादव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कार्यकारी संचालक निरंजन लाल यांनी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या 200 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेत भारतीय सशस्त्र दलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती दिली. बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात ऑर्डनन्स फॅक्टरीचे देशाच्या संरक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत त्यांनी दिव्यांग नागरिकांना सक्षम बनविण्यासाठी सहाय्यक उपकरणांचे वितरण हा संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा लोककल्याणकारी उपक्रमांद्वारे सामाजिक जबाबदारी सातत्याने पार पाडली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ऑर्डनन्स फॅक्टरी, यंत्र इंडिया लिमिटेड आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांनी घेतलेल्या या सामाजिक पुढाकाराचे उपस्थित मान्यवर आणि लाभार्थ्यांनी मनापासून कौतुक केले.
