मध्यप्रदेशातील आरोपींकडून ₹1.06 लाखांचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत; सेंधवा येथील सराफाकडून वितळवलेले दागिने जप्त
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहर पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मध्यप्रदेशातील तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन घरफोडीच्या गुन्ह्यांतील एकूण ₹1 लाख 6 हजार 550 किमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 मे 2026 रोजी मध्यरात्री नवे अंतुली (ता. शिरपूर) येथील रहिवासी विलास देविदास ईशी हे कुटुंबासह घराच्या स्लॅबवर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून ₹44 हजार 550 किमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(अ) व 331(4) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. तपासादरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा या गुन्ह्याशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर ट्रान्सफर वॉरंटद्वारे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यामध्ये मिठाराम भावसिंग लडवी (वय 35), रतला मालसिंग मेहडे (वय 31) आणि जगदीश प्रताप किराडे (वय 32), सर्व रा. मध्यप्रदेश यांनी नवे अंतुली येथील घरफोडीची कबुली दिली. चोरीतील सोने-चांदीचे दागिने त्यांनी सेंधवा (मध्यप्रदेश) येथील सराफा व्यावसायिकाला विकल्याचेही सांगितले.
पोलिसांनी आरोपींसह सेंधवा येथे जाऊन तपास केला असता किशोर मोतीलाल सोनी ज्वेलर्स यांनी संबंधित आरोपींकडून दागिने खरेदी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वितळवलेल्या स्वरूपातील सोने व चांदीची लगड जप्त करण्यात आली.
पुढील चौकशीत आरोपींनी दि. 14 मे 2026 रोजी बोरगाव (ता. शिरपूर) येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील दागिनेही सेंधवा येथील शांतीलालजी सोनी ज्वेलर्स यांना विकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या तपासातून शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याची उकल झाली.
या कारवाईत पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ₹1,06,550 किमतीचे सोने-चांदीचे दागिने (लगड स्वरूपात) जप्त केले असून आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि हेमंत खैरनार तसेच रविंद्र खडमल, अतुल पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, मनोज महाजन, सचिन बाघ, योगेश दाभाडे, भटू साळुंके, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि होमगार्ड मिथुन पचार यांच्या पथकाने केली.
