वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाची दखल नाही; मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भुसावळ | प्रतिनिधी – संघरत्न सपकाळे
भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ग्रामसेवकाविना कार्यरत असल्याने गावातील विकासकामे ठप्प झाली असून नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
फुलगाव हे तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव असूनही ग्रामपंचायतीकडे कायमस्वरूपी ग्रामसेवक किंवा अतिरिक्त प्रभारही उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी उत्पन्न, रहिवासी, जात, जन्म-मृत्यू दाखले, विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव, विकासकामांची प्रशासकीय प्रक्रिया तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.
नियमानुसार ग्रामपंचायतीमध्ये किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामसेवकाची नियुक्ती केली जाते. मात्र फुलगाव ग्रामपंचायत याला अपवाद ठरली असून गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त आहे.
या संदर्भात सरपंच श्याम फुलगावकर यांनी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची अनेकदा प्रत्यक्ष भेट घेतली असून लेखी निवेदनेही सादर केली आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामसेवक हा ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्याच्याच माध्यमातून गावातील विकासकामे, शासकीय योजना आणि प्रशासकीय प्रक्रिया राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामसेवक नसल्याने गावाच्या विकासाला मोठा फटका बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
फुलगाव ग्रामपंचायतीस तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंच श्याम फुलगावकर यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
