सामाजिक समता, शिक्षण व लोककल्याणकारी विचारांचा जागर; विविध मान्यवरांकडून शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन
बदलापूर | प्रतिनिधी
प्रबोधन कट्टाच्या वतीने बदलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान स्मारक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, शिक्षण, आरक्षण आणि लोककल्याणकारी धोरणांचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
यानंतर राजाराम खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत विविध मान्यवरांनी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितकारी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली.
सुभाष रणपिसे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रबोधन कट्टाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अमोल जगधने यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडला. साहित्यिक प्रा. अनिल भालेराव यांनी शाहू महाराज हे रयतेच्या हिताची जपणूक करणारे लोकहितदक्ष व दूरदृष्टीचे शासक असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
आंबेडकरी विचारवंत व लेखक विनायक आढांगळे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच बौद्धाचार्य अशोक गजरमल, पांडुरंग वाव्हळ आणि मिलिंद सकपाळ यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान संजय काळेवाघ आणि पुष्पाताई शिंदे यांनी गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपस्थितांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल शिर्के (भाऊ) यांनी केले. या कार्यक्रमास आर.पी.आय. (आर.के.) पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
