पारंपरिक वेशभूषेत वडाला फेऱ्या मारत केली प्रार्थना; काळेश्वरी देवीला आंब्यांची आकर्षक आरास
धुळे : वटसावित्री पौर्णिमेनिमित्त धुळे शहरात तृतीयपंथीय समाजाने अनोख्या पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या गुरुच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या तृतीयपंथीयांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत श्रद्धाभावाने पूजा केली. यावेळी काळेश्वरी देवीला आंब्यांची आकर्षक आरासही करण्यात आली होती.
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात. मात्र धुळ्यात तृतीयपंथीय समाजाने आपल्या गुरुचे आयुष्य निरोगी आणि दीर्घ व्हावे, तसेच सातही जन्मी हाच गुरु लाभावा, अशी प्रार्थना करत वटसावित्रीचे व्रत साजरे केले. त्यांच्या या अनोख्या परंपरेची शहरात सर्वत्र चर्चा रंगली.
या धार्मिक विधीद्वारे गुरु-शिष्य नात्यातील श्रद्धा, निष्ठा आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. या पूजेमुळे वटसावित्री पौर्णिमेच्या उत्सवाला वेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूप लाभले.
यावेळी नीलू पार्वती जोगी, स्वरा पार्वती जोगी, अलका पार्वती जोगी, साक्षी जोगी, शुभांगी जोगी, जान्हवी जोगी, राधा जोगी, बबीता जोगी, लकी जोगी, माही जोगी, आरु जोगी, रोहिणी जोगी, राशी जोगी, दीपा जोगी आदी तृतीयपंथीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
