देवपूरातील ‘सुलेखन’ व ‘सरस्वती’ उद्यानांचे लोकार्पण; आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून शहरात विकासकामांचा वेग
धुळे, ता. २९ : धुळे शहराला स्मार्ट, सुंदर आणि स्वच्छ बनविण्याचा संकल्प भाजप सरकारने केला असून, गेल्या दीड वर्षांत आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामांद्वारे शहरात विकासरूपी परिवर्तन घडत आहे. ही परिवर्तनाची नांदी आगामी काळातही कायम राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत आणि आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून देवपूर येथील जीटीपी स्टॉपलगत साकारण्यात आलेल्या ‘सुलेखन’ व ‘सरस्वती’ या थीम आधारित उद्यानांचे लोकार्पण रविवारी सायंकाळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनुपभैया अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भा
मरे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री रावल म्हणाले की, धुळे ही जिल्ह्याची राजधानी असली तरी पूर्वीच्या काळात शहराची सातत्याने बदनामी होत होती. मात्र, जनतेने परिवर्तन घडवून आणत राज्यात आणि महापालिकेत भाजपला सत्ता दिल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. मोठ्या शहरांच्या धर्तीवर आधुनिक उद्याने, सुशोभीकरण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जात असून धुळे शहर आता जिल्ह्यातील मॉडेल शहर म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशिष्ट संकल्पनेवर आधारित ‘सुलेखन’ व ‘सरस्वती’ ही उद्याने शहराच्या वैभवात भर घालणारी ठरतील, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी विकासकामांसाठी जनतेच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. महापालिका निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी धुळे शहरातील आगामी विकास आराखड्याची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. गुरुद्वारापासून नगावबारीपर्यंतच्या सात किलोमीटर मार्गावरील वीजखांब हटवून अंडरग्राउंड केबल टाकण्यात येणार असून डिव्हायडरवर आकर्षक रोषणाई केली जाईल. मोठ्या पुलावरील अतिक्रमणे हटवून पुलाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच संतकृपा अपार्टमेंटसमोर नवीन भाजी मार्केट, पंचायत समिती परिसरात दोन आधुनिक उद्याने, नगावबारी टेकडीवर ऑक्सिजन पार्क आणि महापालिकेची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मोगलाई येथील रुग्णालयात २८ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या सीटी स्कॅन सुविधेचा लाभ नागरिकांना केवळ एक हजार रुपयांत उपलब्ध होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. विकासकामांना विरोध होत असला तरी त्यामुळेच या प्रकल्पांची अधिक प्रसिद्धी होत असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांचे मिश्कील शब्दांत आभार मानले. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही मनोगत व्यक्त केले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा प्रास्ताविकातून मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज पाटील यांनी केले. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

