शिंदखेडा तालुक्यातील युवकाचा प्रेरणादायी प्रवास; जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमातून साकारले देशसेवेचे स्वप्न
शिंदखेडा (धुळे) : “स्वप्न मोठं असेल तर अपयश हा शेवट नसतो; तो यशाकडे नेणारा कठीण टप्पा असतो,” या उक्तीचा प्रत्यय देणारा प्रेरणादायी प्रवास धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सारवे गावातील लेफ्टनंट वरुण महेश पाटील यांनी साकारला आहे. सलग सहा वेळा अपयशाचा सामना करूनही हार न मानता अखेर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून निवड होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
वरुण पाटील यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील महेश शामराव पाटील हे जळगाव येथील एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत असून आई विद्या महेश पाटील गृहिणी आहेत. शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी लहानपणापासूनच ते काका सुभाष शामराव पाटील आणि काकू डॉ. वैशाली सुभाष पाटील यांच्याकडे राहिले. काका पाटबंधारे विभागात वर्ग-२ अधिकारी असून काकू शिक्षिका आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने वरुण यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदुरबार येथील पी. जी. पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर एसपीआय, संभाजीनगर येथे बारावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.
लहानपणापासूनच भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या वरुण यांना हे ध्येय गाठण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. एक-दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा त्यांनी SSB मुलाखतीला सामोरे जावे लागले. प्रत्येक वेळी आलेले अपयश, मानसिक ताण आणि पर्यायी करिअरचा सल्ला यांच्यातही त्यांनी आपले ध्येय बदलले नाही.

अपयशातून धडा घेत त्यांनी स्वतःतील उणिवांवर काम केले. अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. अनेकदा अवघ्या चार तासांच्या झोपेवर त्यांनी तयारी सुरू ठेवत प्रत्येक दिवस स्वतःला अधिक सक्षम बनविण्यासाठी समर्पित केला.
अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. त्यांना SSC Tech-64, TGC-141 आणि Indian Navy Pilot अशा तीन वेळा SSB Recommendation मिळाली. त्यानंतर OTA गया येथे प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची IMA देहरादून येथे कायमस्वरूपी आयोगासाठी (Permanent Commission) निवड झाली. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ते भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले.
या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, काका-काकूंचा त्याग, भावंडांचा पाठिंबा आणि स्वतःची जिद्द हेच खरे बळ असल्याची भावना वरुण यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे भाऊ निशांत पाटील, साहिल पाटील, प्रतिक पाटील तसेच बहीण अलिशा पाटील यांनीही त्यांच्या प्रवासात सातत्याने प्रेरणा दिली.
आज सारवे गावासह धुळे आणि जळगाव जिल्ह्यासाठी लेफ्टनंट वरुण पाटील हे प्रेरणेचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या यशाने असंख्य तरुणांना एकच संदेश दिला आहे— “अपयश कितीही वेळा आले तरी स्वप्न बदलू नका; प्रयत्नांची दिशा बदला. जिद्द, मेहनत आणि संयम असेल तर अशक्य वाटणारे ध्येयही वास्तवात उतरते.”
देशसेवेचा गणवेश परिधान करून राष्ट्रसेवेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या लेफ्टनंट वरुण महेश पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या उज्ज्वल सैनिकी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
