कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव : नशिराबाद नगरपरिषदेतील विविध कथित अनियमितता, कामगारांच्या समस्या आणि मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांच्या बदलीची मागणी करत जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे हे गेल्या पाच वर्षांपासून नशिराबाद नगरपरिषदेत एकाच पदावर कार्यरत असून, शासनाच्या बदली धोरणानुसार त्यांची बदली होणे अपेक्षित असतानाही ती झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, घनकचरा व्यवस्थापन आणि साफसफाईच्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून अनियमितता होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सफाई कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय, भविष्य निर्वाह निधी (PF) तसेच इतर कपातींबाबत कामगारांना आवश्यक माहिती दिली जात नसल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
कामगार संघटनेने दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीच्या खर्चाबाबतही प्रश्न उपस्थित केला असून, हा निधी नियमानुसार खर्च होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व कथित गैरप्रकारांची जिल्हाधिकारी स्तरावर सखोल चौकशी करण्यात यावी, मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांची तातडीने बदली करण्यात यावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
