नसरापूर प्रकरणातील जलद निकालाचे स्वागत; गोंडगाव प्रकरणात न्यायप्रक्रियेला गती न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
गोंडगाव प्रकरण पुन्हा चर्चेत • स्थानिक आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप • “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” – भाजप • जलदगती न्यायालय व विशेष सरकारी वकिलाबाबत उपस्थित केले प्रश्न
भडगाव, प्रतिनिधी : गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, भारतीय जनता पक्षाने या प्रकरणात स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भडगाव येथील अटल भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी पीडितेला अद्याप न्याय मिळालेला नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायप्रक्रियेला गती न मिळाल्यास तालुकाभर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते अनिल वाघ यांनी नसरापूर येथील अल्पवयीन मुलीव
रील अत्याचार व हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने अवघ्या ६० दिवसांत दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायव्यवस्था आणि महायुती सरकारचे अभिनंदन केले. अशा जलद आणि कठोर निर्णयांमुळे समाजातील विकृत प्रवृत्तींवर प्रभावी प्रतिबंध निर्माण होतो आणि पीडित कुटुंबांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी गोंडगाव प्रकरणाचा उल्लेख करत अनिल वाघ यांनी स्थानिक आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये गोंडगाव येथे सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर भडगाव तालुका आणि जळगाव जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. सर्वपक्षीय मोर्चे, व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद आणि विविध सामाजिक संघटनांच्या आंदोलनांमुळे या प्रकरणाने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
भाजपच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही पीडित कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याची खंत व्यक्त करत, या प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा करण्यात स्थानिक आमदार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला.
पत्रकार परिषदेत भाजपने शासन आणि संबंधित यंत्रणांसमोर काही प्रश्नही उपस्थित केले. गोंडगाव प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्षात जलदगती न्यायालयात सुरू आहे का? विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे का? की जनतेची दिशाभूल करण्यासाठी केवळ घोषणा करण्यात आल्या? तसेच या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रभावी पाठपुरावा का केला नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण करण्याचा पक्षाचा उद्देश नसून, पीडितेला न्याय मिळणे हीच त्यांची भूमिका आहे. प्रशासनाने आणि न्याययंत्रणेने या खटल्याची सुनावणी गतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून द्यावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुक्यात व्यापक आणि तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला भाजपचे नेते अनिल वाघ, तालुकाध्यक्ष विनोद देविदास नेरकर, सोमनाथ पाटील, नगरसेवक सचिन चोरडिया, योजना पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील, सुशीलाताई पाटील, शहराध्यक्षा योगिता वाघ, किरण शिंपी, शुभम सुराणा, आबा महाजन, नगरसेवक मुरलीधर मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

