समोरासमोर धडकेत तिघे गंभीर जखमी; पोलिसांकडून तपास सुरू
धरणगाव | प्रतिनिधी
धरणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात भांबर्डी येथील विनोद प्रताप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विनोद पाटील हे एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत दोन्ही दुचाकींवरील चारही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. अपघातात विनोद पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातातील एका दुचाकीचा क्रमांक MH-19-59-33 असल्याची माहिती मिळाली असून, दुसऱ्या दुचाकीची ओळख अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. संबंधित वाहन किंवा त्यावरील व्यक्तींबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी धरणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंदोबस्त तैनात केला. जखमी तिघांना तत्काळ जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, टोनी महाजन, मोहन पाटील, शिवसेनेचे युवा नेते प्रतापराव पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कैलास माळी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. मृतदेह रुग्णालयात हलविण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. पोलीस अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास करत आहेत.