मोफत दप्तर, पाण्याच्या बाटल्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण; विद्यार्थिनीचा वाढदिवसही आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा
झुरखेडा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप • एस. पी. इलेक्ट्रिकल्सचा पुढाकार • विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविचारांचा जागर • वाढदिवस साजरा करून दिला प्रेरणादायी संदेश
धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील)
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर, पाण्याच्या बाटल्या तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला असून शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमासाठी पाळधी येथील एस. पी. इलेक्ट्रिकल्सचे संचालक पियुष पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक शालेय दप्तरांची भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांसह पाण्याच्या बाटल्या, वह्या, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. दर्जेदार साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमात केवळ साहित्य वाटपच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि आपुलकीची भावना निर्माण करणारा आगळावेगळा उपक्रमही राबविण्यात आला. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी जानवी मनोज विसावे हिचा वाढदिवस शाळेतच उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिला केक भरवून शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच शैक्षणिक साहित्य भेट देत तिचा सत्कार करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी झुरखेड्याचे लोकनियुक्त सरपंच सुरेश आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” या विचाराचा उल्लेख केला. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि ज्ञानाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी हे देशाचे भावी शिल्पकार असून त्यांच्यामध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करणारे असे सामाजिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपस्थित मान्यवरांनी एस. पी. इलेक्ट्रिकल्सच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा विधायक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच सुरेश आप्पा पाटील, उपसरपंच बबन नाना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री विसावे, संजय चौधरी, वैशाली विसावे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक विकास पाटील, उपशिक्षक गजानन माळी तसेच उपशिक्षिका सुनिता चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शिक्षणाबाबत समाजातील सकारात्मक सहभागाचे उत्तम उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
