विधीसंघर्षग्रस्त बालकासह चौघांच्या टोळीचा भांडाफोड; ₹५४,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अद्याप फरार
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील शंभर फूट रोड परिसरात झालेल्या जबरीचोरी आणि मारहाणीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत चाळीसगाव रोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत विधीसंघर्षग्रस्त बालकासह चौघांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, ₹५४ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
३० जून २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धुळे शहरातील शंभर फूट रोडवरील डी-मार्टजवळ आणि बंद असलेल्या शासकीय दूध डेअरीच्या परिसरात फिर्यादी शोएब शब्बीर शहा (वय ३२, रा. म्हसदी, ता. धुळे) यांना अडवून तीन अज्ञात आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या शर्टच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, ₹४ हजारांची रोख रक्कम तसेच मोबाईलद्वारे ₹९०० ऑनलाईन ट्रान्सफर करून जबरीचोरी केली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी सपोनि विवेक पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चिरंतन ऊर्फ दादू सतीश गवळी, हर्षल राजेंद्र मेढे आणि वृत्ताय ऊर्फ दस दिनेश पाटील यांच्या साथीने जबरीचोरी केल्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान आरोपींकडून लुटलेला मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा ₹५४,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी हर्षल राजेंद्र मेढे याला अटक केली असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या हर्षल मेढे याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीचा इतर गुन्ह्यांशीही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विकास आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि विवेक पवार, पोउनि संदीप काळे तसेच पोलीस अंमलदार अजय जाधव, ललितचंद चौधरी, रमाकांत पवार, सचिन पाटील, इंद्रजित वैराट, शोएब बेग, अतिक शेख आणि सिराज खाटीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या धडाकेबाज कारवाईमुळे चाळीसगाव रोड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत असून, शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
