पाचोर्यात सत्यश्याम आरोग्यवर्धक उत्पादन उपक्रमानिमित्त पत्रकार परिषद; सकारात्मक जीवनशैलीवर मार्गदर्शन
पाचोरा | प्रतिनिधी
सध्याच्या स्पर्धेच्या युगात वाढता तणाव, धावपळ आणि सोशल मीडियाचा अतिरेक यामुळे अनेकजण नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. अशा परिस्थितीत सकारात्मक विचारसरणी अंगीकारल्यास जीवन आनंदी, निरोगी आणि तणावमुक्त होऊ शकते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध फार्मसिस्ट, प्रेरणादायी वक्ते व उतुंग भरारी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी केले.
पाचोरा येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले उमेश महाजन यांनी सुरू केलेल्या सत्यश्याम आरोग्यवर्धक उत्पादन उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मूळ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील रहिवासी असलेले आणि सध्या मुंबई येथे फार्मास्युटिकल क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी सकारात्मक जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि यशस्वी आयुष्य याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात केली की सुरुवातीला विरोध आणि नकारात्मक प्रतिक्रिया येतात. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. अनेक वैज्ञानिकांनी विरोधाला न जुमानता जगाला क्रांतिकारी शोध दिले. प्रत्येकाने जीवनात ध्येय निश्चित करून समाजाला अभिमान वाटेल असे कार्य करण्याचा प्रयत्न करावा.”
ते पुढे म्हणाले की, आज प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत व्यस्त आहे. मात्र या धावपळीत कुटुंबीयांना वेळ देणे कमी झाले आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत असून त्यामुळे नातेसंबंध आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. दिवसभर सकारात्मक विचार केल्यास दिवस आनंदात जातो, तर नकारात्मक विचार मनात ठेवले तर नैराश्य वाढते. निसर्गाने प्रत्येकाला दिलेल्या सकारात्मक ऊर्जेचा योग्य वापर केल्यास जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक बनू शकते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत सराफ, आबा सूर्यवंशी, नंदू शेलकर, उमेश राऊत, आबा येवले, प्रमोद पाटील, निखिल मोर, दिलीप परदेशी, अनवर शेख, प्रदीप परदेशी आणि चिंतामण पाटील यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश महाजन यांनी केले. तर ज्येष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी यांनी पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमाबद्दल उमेश महाजन यांचे कौतुक केले.
