तलाठी कार्यालयासमोरील पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना; सिमेंटचे पाईप दाखल, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
पहाण (ता. पाचोरा) | प्रतिनिधी वाल्मीक जाधव
पाचोरा तालुक्यातील पहाण गावातील विविध समस्यांकडे लक्ष वेधणाऱ्या दैनिक जनसम्राट टाईम्सच्या वृत्ताची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील तलाठी कार्यालयासमोर पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
तलाठी कार्यालयासमोरील पाणी निचरा करण्यासाठी आवश्यक सिमेंटचे पाईप घटनास्थळी दाखल झाले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. तसेच पहाण गावातील बल्लीवरील रस्त्याच्या प्रलंबित समस्येवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या कामामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, पावसाळ्यात निर्माण होणारी गैरसोय दूर होणार आहे. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेबद्दल आणि तातडीने कार्यवाही केल्याबद्दल पहाण ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
या विकासकामासाठी सहकार्य करणारे संबंधित प्रशासन, अधिकारी तसेच शीतल कन्स्ट्रक्शन यांच्या संपूर्ण टीमचे पहाण ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून अशीच विकासकामे वेगाने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
