वारंवार निवेदनांनंतरही रस्ता दुरुस्त न झाल्याने संताप; मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी, तीव्र आंदोलनाचा इशारा
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील अत्यंत वर्दळीचा बारापत्थर ते चाळीसगाव रोड या मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी व निवेदने देऊनही रस्ता दुरुस्त न झाल्याने एका तरुणाने खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून आंघोळ करत अनोख्या पद्धतीने महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला.
सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड यांनी या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या तरुणाने लक्षवेधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
खड्ड्यातील पाण्यात बसून आंघोळ करत त्याने महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अनोख्या आंदोलनामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावर मोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वार आणि वाहनधारक अपघातग्रस्त झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या जीवघेण्या परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी तातडीने पावले उचलते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
