नशिराबाद: । धीरज सैतवाल जैन । विशेष प्रतिनिधी ।
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील गरजू व होतकरू सहा विद्यार्थिनींना रोटरी क्लबने या शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेतले असून, त्यांना शैक्षणिक साहित्याचे किट प्रदान करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत रोटरी ईस्टचे सदस्य श्री. मधुकर चौबे आणि श्री. सुशील असोफा यांच्या हस्ते विद्यार्थिनींना आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना रोटरी ईस्टचे अध्यक्ष डॉ. मनोज चौधरी यांनी रोटरी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लवकरच शाळेत विशेष ‘मेडिकल चेकअप कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
याप्रसंगी रोटरी ईस्टच्या प्रेसिडेंट पूजा अग्रवाल, सदस्य श्री. सुशील असोफा, श्री. राहुल सिंग तसेच नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चौबे, अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे आणि मुख्याध्यापिका श्रीमती एस. ए. बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार राजू पाचपांडे यांनी मानले. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
