जळगावच्या पिंप्राळा येथील सोमानी मार्केटमधील घटना; ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास
जळगाव | जगदीश सपकाळे । प्रतिनिधी
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी पान मसाल्याचे दुकान फोडून सिगारेटचे बॉक्स आणि रोकड असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सुखदेव नरवाडे (वय ५२, रा. पिंप्राळा) यांचे सोमानी मार्केटमध्ये पान मसाल्याचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून शटरला कुलूप लावले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील सिगारेटचे बॉक्स तसेच गल्ल्यातील रोकड चोरून नेली.
बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजता दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
चोरट्यांनी १० हजार ८०० रुपयांचे गोल्ड फ्लेक सिगारेटचे चार बॉक्स, १७ हजार ६०० रुपयांचे अडव्हान्स सिगारेटचे पाच बॉक्स, ४ हजार ४०० रुपयांचे मिक्सपॉट सिगारेट बॉक्स तसेच गल्ल्यातील ५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सुशील चौधरी पुढील तपास करीत आहेत.
