फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची मागणी • न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन जानवी जितेंद्र ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून हा खटला विशेष जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र परिट सेवा मंडळ आणि धुळे जिल्ह्यातील समाजबांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन जानवी ठाकरे हिला सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागला आणि त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना केवळ एका मुलीवरील अन्याय नसून संपूर्ण समाजाच्या सन्मानावर आणि महिला सुरक्षेवर झालेला गंभीर आघात असल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र परिट सेवा मंडळाचे कार्यकर्ते संजय वाल्हे आणि दीपक वाघ यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत सखोल तपासाची मागणी केली. त्यानंतर मुख्य संशयिताला अटक करण्यात आली असली, तरी केवळ अटक करून प्रकरण संपणार नाही. या गुन्ह्यातील सर्व संबंधितांवर कठोर कलमांखाली कारवाई करून दोषारोपपत्र लवकर दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात हा खटला नियमित न्यायालयात न चालवता विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तपासात कोणताही विलंब किंवा हलगर्जीपणा होऊ नये, असेही समाजबांधवांनी प्रशासनाला बजावले.
यावेळी समाजबांधवांनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ एका कुटुंबाची नसून राज्यातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या प्रकरणात कठोर आणि आदर्शवत कारवाई होणे आवश्यक आहे.
समाजबांधवांनी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे सांगत, प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निषेधाच्या घोषणांसह समाजबांधवांनी “लेकीला न्याय मिळालाच पाहिजे” अशी जोरदार मागणी करत प्रशासनाने या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
