दूध फेडरेशन रोडवरील घटना; सुमारे ₹५० हजारांचे नुकसान, जीवितहानी टळली
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सोपाननगर, दूध फेडरेशन रोडवरील दिनेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी (दि. १० जुलै) सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन विभागाला सकाळी ८.५० वाजता प्राची तायडे यांनी दूरध्वनीद्वारे दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयातील बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाला. जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले.
या आगीत दुकानातील पंखे, कुलर, इलेक्ट्रिक मोटारी तसेच इतर इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ₹५० हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

सदर इमारत दोन मजली असून तळमजल्यावर इलेक्ट्रिकल्सचे दुकान तर वरच्या मजल्यावर रहिवासी वास्तव्यास आहेत. आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याने वरच्या मजल्यावरील रहिवाशांना कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
दुकानाचे मालक दिनेश भगवान परदेशी असून, आग विझविण्याच्या मोहिमेत अग्निशमन विभागाचे वाहनचालक प्रकाश चव्हाण तसेच फायरमन संजय तायडे, नितीन ससाने आणि किरण पाटील यांनी तत्परतेने कार्य करत आग पूर्णपणे विझवली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.
