‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे सन्मान; संघर्षातून घडवला यशाचा नवा आदर्श
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ)
अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील कन्या कु. पूजा पाटील हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
कु. पूजा पाटील ही वडगाव टेक येथील रहिवासी असून श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाची विद्यार्थिनी आहे. तिचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही पूजाने परिस्थितीसमोर हार न मानता सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वी निवड मिळवली. विशेष म्हणजे, ती आपल्या गावातील पहिली महिला पोलीस ठरली आहे.
तिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अनुजा देशमुख, लिनेस क्लबच्या सचिव सौ. सरलाताई पाटील, ज्येष्ठ संचालिका सौ. उज्वलाजी चोरडिया, सौ. पिंकीजी जुनोदिया, सौ. पूजाजी देसाई आणि कु. चेतना हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी कु. पूजा पाटील हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, समाजातील प्रत्येक मुलीने शिक्षण, आत्मविश्वास, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार करावा, असा प्रेरणादायी संदेश दिला.
