चिखलमय रस्त्याच्या समस्येवर प्रशासनाची तातडीची कार्यवाही; ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
गिरीश चौधरी ममुराबाद | प्रतिनिधी
ममुराबाद येथील सोनार गल्लीतील रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत जनसम्राट टाइम्सने प्रकाशित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अखेर रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात चिखलमय झालेल्या या रस्त्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हालचाली करत रस्त्याचे खडीकरण आणि तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे सोनार गल्लीतील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना वाढत होत्या. या समस्येकडे जनसम्राट टाइम्सने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत प्रत्यक्ष काम सुरू केले.
रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. मात्र, केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता रस्त्याचे कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम करण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांनी जनसम्राट टाइम्सने नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
