भाजीपाला मार्केटमधील सडका कचरा, दुर्गंधी व आरोग्य धोक्याचा मुद्दा; पत्रकार संदीप महाजन यांची विविध विभागांकडे तक्रार
भुवनेश्वर दुसाने पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट परिसरात सडका भाजीपाला, जैविक कचरा, घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उघड्यावर साचत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप करत पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप दामोदर महाजन यांनी विविध शासकीय विभागांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. सात दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर “अर्धनग्न होऊन भीक मांगो आंदोलन” करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाजन यांनी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कृषी पणन संचालक, सहकार विभाग, जिल्हा परिषद, नगरपरिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भाजीपाला मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात सडका भाजीपाला, फळे, खराब धान्य, पालेभाज्या, प्लास्टिक व इतर जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असून तो अनेक दिवस न उचलल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे बाजार समितीसमोरील रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महाजन यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, त्यांचे निवासस्थान बाजार समितीसमोर असल्याने या अस्वच्छतेचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. दुर्गंधीमुळे घराच्या खिडक्या उघडणे, जेवण करणे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना घरात राहणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सडलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास, उंदीर व भटकी कुत्री यांचा वावर वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

याशिवाय बाजार समिती परिसरात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडसाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या व मंजूर आराखडा आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाजन यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६, घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ चा उल्लेख करत बाजार समिती ही मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारी संस्था (Bulk Waste Generator) असल्याने संबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे.
निवेदनात जिल्हास्तरीय संयुक्त समितीकडून प्रत्यक्ष पाहणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पर्यावरणीय तपासणी, संपूर्ण कचरा तातडीने हटविणे, नियमित स्वच्छता व्यवस्था, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी अशा १४ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर “अर्धनग्न होऊन भीक मांगो आंदोलन” करण्यात येईल.
